|
Answer» "आपला देश"
आपला भारत देश हा विशाल आहे. भारताच्या उत्तरेस हिमालय, पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस ब्रह्मदेश व चीन हे देश आणि दक्षिणेस हिंदी महासागर आहे.
जगातील अतिभव्य असा हिमालय आणि विंध्याचल, सातपुडा व सह्याद्री यांच्यासारखे पर्वत आपल्या देशात आहेत. गंगा, यमुना, महानदी, तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कोयना यांच्यासारख्या मोठमोठ्या नद्या आहेत. त्यांच्या पाण्यामुळे जमीन सुपीक बनून अनेक पिके, फळे व फुले यांनी भारतभूमी समृद्ध झाली आहे.
द्वारका, काशी, जगन्नाथपुरी, रामेश्वर, पंढरपूर, गाणगापूर, शेगाव, शिर्डी यासारखी पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. काश्मीर व केरळच्या सृष्टिसौंदर्याला या जगात तोड नाही. ताजमहाल, सांची-स्तूप, कुतुबमिनार या ऐतिहासिक वास्तू आणि अजिंठा, वेरुळसारखी कोरीव लेणी ही तर जगातील आश्चर्ये ठरली आहेत.
अनेक पराक्रमी राजे, धर्मसंस्थापक, संत आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान विभूती आपल्या देशात होऊन गेल्या. त्यांनी भारताची संस्कृती घडवली, वैभव वाढवले. सर्व जगात भारतीय संस्कृती जुनी व श्रेष्ठ ठरली आहे.
आज आपला भारता स्वतंत्र प्रजासत्ताक असा देश आहे. आपला देश आणि आज विज्ञानक्षेत्रात व निरनिराळ्या उद्योगधंद्यात प्रगती करत आहे. आपणही भारताच्या प्रगतीसाठी झटूया.
किती विशाल भारत देश | किती भाषा, अनेक वेष ||
परी हृदय खोदूनि बघता | 'आम्ही असू एक' हा जयघोष ||
|